१३१० मध्ये देवगिरीचा पाडाव झाल्यावर हा गड दिल्लीच्या अधिपत्याखाली आला. कालांतराने त्यावर बहामनी साम्राज्याचे वर्चस्व प्रस्थापित झाले. बहामनी राजवटीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर हा गड आदिलशहाकडे गेला. कोल्हापूरहून जवळ आणि कोकणाच्या मार्गावरचा महत्त्वाचा किल्ला असल्यामुळे तो संरक्षण आणि व्यापारीदृष्ट्याही महत्त्वाचा होता. हे शिवरायांनी हेरले आणि गड ताब्यात घेऊन त्याची गरजे नुसार डागडुजी केली. नंतरच्या काळात राजाराम महाराजांनी गगनगड किल्ला व गगनबावड्याची जहागिरी रामचंद्रपंत अमात्य यांना बहाल केली. पुढे महाराष्ट्रावर इंग्रजांचा अंमल सुरू झाला. १८४४ ला गगनगड, सामानगड या किल्ल्यांच्या सुभेदारांनी इंग्रजांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इंग्रजांनी तोफगोळ्यांचा मारा करून तटबंदीची बरीच पाडापाड केली. ह्या पट्ट्यातील बऱ्याच गडांवर स्वातंत्र्य क्रांतीने शिव विचारांनी प्रेरित असलेले क्रांतिकारी गनिमी काव्याने लपलेले होते आणि इंग्रजांसाठी डोकेदुखी बनून इंग्रज राजवटेला जिद्दीने प्रतिकार करत होते. गगनगड वर चढाई करताना पायर्यांच्या सुरुवातीला एक म्हसोबाचे मंदिर लागते ज्यांच्या समोर एक रेडयाची प्रतिमा उभी ठाकली आहे. पायर्या चढून आल्यावर एक प्रशस्त नैसर्गिक गुहा लागते. गगनगिरी महाराजांनी याच गुहेत तपसाधना केली होती. त्यामुळे या गुहेत त्यांचे मंदिर बनवण्यात आले आहे. गुहेत बाजूलाच नवनाथ प्रतिमा स्थापित असून शिवराज्यअभिषेकची प्रतिमा सुद्धा प्रस्थापित आहे. गुहेच्या बाहेर कातळात वेगवेगळे दैवी प्रसंग कोरलेली आहेत त्यातच भव्य हनुमंताची प्रतिमा, राम, लक्ष्मण, सीता व शंकराची प्रतिमा, विभीषण जटायू जांभूवंत, शेषनाग सोबत श्री नारायण आणि भगवान श्री कृष्ण अर्जुनाला गीता परिचय करूनदेताना अशी अनेक रूपे स्थापित आहेत. गड माचीवर ध्यान मंदिर, दत्त मंदिर, पुरातन महादेवस्थान, भक्तनिवास व नवग्रह मंदिर आहे. माची- बुरुजावर आजही २ तोफा घाट वाटेवर रोखून उभ्या आहेत. माचीवरून तटबंदी लगत एक मार्ग जातो, या ठिकाणी चिलखत बुरुज रचना पहायला मिळते. भव्य बुरुज आणि बाजूला असलेली तटबंदी मधील दरवाजा बांधणी गडाच्या संरक्षण हेतू घेतलेली चोख काळजी दर्शवतात. कड्या लगत असणारी प्राचीन काळातील लपलेली पाण्याची टाके, पंचवटी कुंड पाण्याचे उत्तम नियोजन आणि नावीन्य पूर्ण बांधणी निदर्शनास आणतात. गगनगड बालेकिल्लाला प्रदक्षिणा मारून वर आल्यावर विठ्ठलाई देवीचे दर्शन होते. माथ्यावर एक निशाण बुरुज आजही तग धरून उभा आहे. हा बुरुज म्हणजे आजूबाजूच्या सहय़ाद्रीवर नजर रोखणार पहारेकरीच... गगनगड अर्धा कोकण आपल्या नजरेत सहज काबीज करतो. त्यामुळेच या गडाची भुरळ हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवाजी महारायांना पडलीच होती. कारण कोकणातून-देशावर चढणाऱ्या अनेक घाटवाटांचा हा दुर्ग जणू एक आधारस्तंभच! अनेक वर्षे लोटली तरी आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा आणि कर्तृत्वाचा वारसा हे दुर्ग जागून आहेत आणि आजूबाजूचे कातळ अवशेष त्याची यथोचित अनुभूती करून देतात... अश्याप्रकारे गगनगड अभ्यास मोहीम पॉईंट ब्रेक एडवेंचरचे कार्याध्यक्ष व इतिहासाची जाण आणि मान राखणारे श्री. जॉकी साळुंके यांच्या समवेत फत्ते झाली. हर हर महादेव 🚩
